शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमोल कोल्हे म्हणाले आहेत की, आढळराव पाटील हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. एका वयस्कर नेत्याचा डिजिटल युगाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया जो कुणी बघतो आहे, त्यांना माझे फेसबुक पेज दाखवावे, सर्व कामांची माहिती तिथे आहे. ज्येष्ठ नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा देखील खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वखालील आज पासून जुन्नर येथून जनाक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी आढळराव पाटलांवर टीका केली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघ गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. त्यात अमोल कोल्हे यांनी आढळराव यांच्या टीकेला उत्तर दिल्याने आता चांगलाच कलगीतुरा रंगताना पहायला मिळणार आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने कांद्याला निर्यात बंदी केली. याबाबत लोकसभेत आवाज उठवला तर माझे आणि सुप्रिया ताईचे निलंबन केले. मग आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही का? आमच्या निलंबनाबाबत राज्यातील एकाही नेत्याने निषेध व्यक्त केला नाही की, हे निलंबन चुकीचे आहे. याची खंत वाटली. मात्र लाखोंच्या पोशिंद्यावर जर अन्याय होत असेल तर यावर मोर्चा काढून सरकारला जागे करावेच लागणार, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.