नाशिकमध्ये पार्सल पॉईंटमध्ये गॅस गळतीमुळे सिलिंडरच्या स्फोटात दोघे जखमी झाले आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. वक्रतुंड या पार्सल पॉइंट शॉपमध्ये ही घटना घडली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहरात दुःखद घटना घडली आहे. इंदिरानगर भागातील कलानगर येथे आज सकाळच्या सुमारास एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे. वक्रतुंड या पार्सल पॉइंट शॉपमध्ये गॅसच्या भडकेने हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पार्सल पॉइंट चालक आणि एक कर्मचारी असे दोन जण जखमी झाले आहे. या दोघांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथक देखील दाखल झाले असून ह्या घटनेचे नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. मात्र या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलेंडरच्या लिकेजमुळे रात्रभर गॅस या पार्सल पॉईंटच्या दुकानात जमा झाला. आज सकाळी दुकानाचे मालक आणि कर्मचारी येताच त्यांनी पार्सल पॉईंट या दुकानाचे सेंटर उघडून लाईटचे बटन चालू केले. त्यामुळे याचा भडका झाला आणि भीषण असा स्फोट झाला. दरम्यान या घटनेत या पार्सल पॉईंटचे मालक आणि एक कर्मचारी हे गंभीररित्या भाजले असून त्यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.
या घटनेत ते साठ टक्क्यांहून अधिक भाजल्याची माहिती देखील मिळाली आहे. या घटनेत पार्सल पॉइंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या स्फोटाच्या तीव्रतेने पार्सल पॉईंटमधील साहित्य हे रस्त्यावर उडाले. या स्फोटाच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनास्थळावर बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गॅस सिलेंडरच्या कंपनीकडून देखील या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे.