अल्ट्रासाऊंडमध्ये दोन बाळं दिसत असताना प्रसुतीनंतर महिलेच्या कुटुंबाकडे केवळ एकच बाळ देण्यात आलं. दुसरं बाळ कुठे आहे असा प्रश्न मग कुटुंबाकडून विचारण्यात आला.
त्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा महिला रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधून बाळ गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नवजात बाळ चोरीला गेल्याचा आरोप प्रसुती झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी केला. अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये दोन बाळं दिसत होती. पण प्रसुतीनंतर आम्हाला केवळ एकच बाळ देण्यात आलं, असा दावा कुटुंबियांनी केला.
या प्रकरणाची तक्रार प्रसूत झालेल्या महिलेचे पती रमेश कुमार यांनी सीएमएसकडे केली. रमेश कुमार यांनी रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. घटना नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दुबखरा गावात घडली आहे. नुकत्याच बाळंत झालेल्या रेखा यांचे पती रमेश कुमार यांचे पती सीएमएसकडे तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. २९ डिसेंबरच्या दुपारी तीन वाजता मी पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. संध्याकाळी पाचच्या सुमारास शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आमच्या हाती एक बाळ देण्यात आलं. पण अल्ट्रासाऊंडमध्ये पत्नीच्या गर्भात दोन बाळं दिसत होती, असं रमेश कुमार यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
प्रसुती झालेल्या महिलेच्या पतीनं या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती सीएमएस प्रदिप कुमार श्रीवास्तव यांनी दिली. अल्ट्रासाऊंडमध्ये दोन बाळं दिसत होती. पण आम्हाला ऑपरेशननंतर केवळ एकच बाळ देण्यात आलं, असं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. एक बाळ कुठे गेलं याचा शोध घेण्यासाठी आम्ही चौकशी सुरू केली आहे. लवकरच कारवाई केली जाईल, असं श्रीवास्तव म्हणाले.