जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या धोका लक्षात घेता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारची आरोग्य तज्ज्ञ समिती कोविड-19 प्रतिबंधात्मक लसींच्या बूस्टर डोसच्या गुणवत्तेवर विचार करत आहे. दुसरा बूस्टर डोस घेण्याबाबत सरकारमध्ये खलबतं सुरु आहेत. पहिला बूस्टर डोस आणि त्याचा परिणाम तसेच गुणवत्ता यांचा कालावधी तपासला जात आहे. सध्या फक्त 28 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता, केंद्र सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये कोविड लसीचा बूस्टर देण्यास सुरुवात झाली. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप एक्सपर्टने सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञ समितीकडून दुसरा बूस्टर डोसचा घेण्याची गरज आहे का, यावर विचार केला जात आहे. याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व वैज्ञानिक डेटाचा बारकाईने अभ्यास करण्यात येईल.
संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती साधारणपणे चार ते सहा महिन्यांनी कमी होते. तसेच बूस्टर डोस गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत करतो. तज्ज्ञ आता दुसरा बूस्टर डोस म्हणजे कोविड लसीचा चौथा डोस घेण्याबाबत आरोग्य प्रशासनाचं निरीक्षण सुरु आहे. याबाबत अधिक माहिती येत्या काळात समोर येईल.
काही डॉक्टरांनी कोविड लसीचा चौथा डोस म्हणजे दुसरा कोविड बूस्टर डोस सुरु करण्याची मागणी केली आहे. अधिक जोखीम असलेल्या लोकांसाठी जसे की आरोग्य सेवा कर्मचारी, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी दुसरा बूस्टर डोस देण्याची विनंती करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी 26 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना दुसऱ्या बूस्टर डोसबाबत सांगितले आहे. आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी सुमारे एक वर्षापूर्वीच कोविड लसीचा तिसरा डोस देण्यात आला होता.