राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यास काँग्रेस नेत्यांनी सन्मानपूर्वक नकार दर्शवला आहे. मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसनं अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाचं निमंत्रण अस्वीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं या संदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करुन निर्णयाची माहिती दिली आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे आणि अधीर रंजन चौधरी हे जाणार नाहीत.
काँग्रेसचे महासरचिटणीस जयराम रमेश यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देण्यात आलं होतं. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. धर्म ही एक व्यक्तिगत बाब आहे. आरएसएस आणि भाजपनं राम मदिंराच्या विषयाला कित्येक वर्षापासून राजकारणाचा विषय केलेला आहे.
मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना देखील भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी उद्घाटन निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून केलं जात आहे. २०१९ च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं पालन करत आणि भगवान रामाच्या लाखो भक्तांच्या भावनांचा आदर करत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी आरएसएस आणि भाजपच्या कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक अस्वीकृत केल आहे, असं जयराम रमेश म्हणाले.
दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेकडून काँग्रेसला जर यायचं नसेल तर त्यांची इच्छा असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यांना निमंत्रण पाठवलं आहे. त्यांना यायचं नसेल तर त्यांची भूमिका, असं विहिंपनं म्हटलं आहे.