बांधकाम करायचे असेल तर आम्हाला पाच लाख रूपये द्यावे लागतील. अन्यथा आहे ती बिल्डिंग पाडून टाकू, असे म्हणत खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत राम तळभंडारे (रा. भैरू वस्ती विजापूर रोड), कृष्णा नागेश जाधव (रा. सलगर वस्ती डोणगाव रोड) अन्य दोघे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवानंद मल्लेश पाटणकर (वय ४० रा. भैरू वस्ती, लिमयेवाडी) यांनी २०१७ मध्ये विजापूर रोडवरील परिहार अर्पाटमेंट समोरील तुकाराम लक्ष्मण जाधव यांची दोन हजार ४०० स्क्वेअर फुट जागा रीतसर खरेदी केली होती. २०२२ मध्ये जागेवर बांधकामाला सुरुवात केली.
जागेवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.५० वाजता चौघे शिवशंकर पाटणकर यांच्या अपार्टमेंटचे काम सुरू असलेल्या विजापूर रोडवरील जागेवर आले. दोघांनी प्रथमतः ही जागा आमची आहे, येथे बांधकाम करायचे नाही, असे म्हणाले. पाटणकर यांनी ही जागा माझी असल्याचे सांगताच, त्यांनी तुला बांधकाम करावयाचे असेल तर आम्हाला पाच लाख रूपये द्यावे लागतील. अन्यथा तुला जिवे ठार मारू आणि बांधलेली बिल्डिंग पाडू, असे म्हणून निघून गेले. ४ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा कृष्णा जाधव व त्याचा एक साथीदार आला, दोघांनी लास्ट वॉर्निंग देतो. पाच लाख रूपये दे अन्यथा बांधकाम पाडतो तुला दोन दिवसातच खल्लास करतो, अशी धमकी दिली, असे शिवानंद पाटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. तपास फौजदार गायकवाड करीत आहेत