प्रतिनिधी.औरंगाबाद (दि.4जानेवारी 2023)
राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ची तयारी पूर्ण झाली असून औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरीक येथे ५ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान उद्योजकांचा महाकुंभ भरणार आहे. उद्योजकांची संघटना मसिआच्यावतीने आयोजित केलेले प्रदर्शन तब्बल ३० एकरांवर भरणार असून ४ दिवसात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करतील तर समारोपाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. चार दिवसात एक हजार कोटीच्या उलाढालीचा आयोेजकांना विश्वास आहे.
मसिआच्यावतीने दर तीन वर्षानी ‘अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो’ औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान भारतातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर ऑरीक सिटी, शेंद्रा येथे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन देणे, लघु उद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे तसेच नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे हे प्रदर्शनाचे उद्धिष्ट आहे. मसिआसोबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, एमआयडीसी आणि ऑरीक सिटीच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, कन्व्हेनर अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले, मुख्य प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, ज्वाईंट पीआरओ रवी आहेर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
प्रदर्शनाचे उद्घाटन ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने करतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रावसाहेब दानवे, खासदार इम्तीयाज जलील, कॅबीनेट मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहतील. समारोपाच्या सत्राला ८ जानेवारी रोजी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल.
१००० कोटीची उलाढाल
२०२० मध्ये झालेल्या महाएक्स्पोमध्ये ४५० ते ५०० कोटीची उलाढाल झाली होती. यंदा ती १ हजार कोटीचा पल्ला गाठेल, असा विश्वास अध्यक्ष किरण जगताप यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष
भारत देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमीत्ताने प्रदर्शनाची व्यात्पी मोठी करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. एमएसएमईंना चालना देण्यासाठी, त्यांना जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या प्रदर्शनाकडे बघीतले जात आहे. महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील उद्योजकांना प्रदर्शनात आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी खास प्रयत्न केले आहेत. प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागी आहेत.
नामांकित कंपन्यांचा सहभाग
रेल्वे विभाग, सिमेन्स, इंडयूरन्स, एंडर्स हाऊजर सारख्या नामांकित कंपन्या लघु उद्योजकांना काम देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी खास बीटूबी मिटींग आयोजित करण्यात आल्या आहेत. अनेक कंपन्यांचे पर्चेस व मटेरियल अधिकारी भेटी देतील. यात प्रामुख्याने रॉयल एनफील्ड, भारत फोर्ज, जेसीबी, आनंद ग्रुप, बजाज ऑटो लि. , इंडयूरन्स, व्हेरॉक, संजीव ऑटो आदींचा सहभाग आहे. तसेच विविध विषयावर सेमिनार, व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आदीतून उद्योजकांना नक्कीच फायदा होणार असल्याचे आयोजकांचे मत आहे.
अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपोची ठळक उद्दिष्टे
⦁ राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन
⦁ ३० एकरावर ६५० हून अधिक जास्त स्टॉल्स
⦁ चार दिवसात १ लाख अभ्यागत अपेक्षीत
⦁ १०,५०० चौरस मिटरवर प्रॉडक्ट डिस्प्ले
⦁ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांचा सहभाग
⦁ औद्योगिक क्षेत्राशी निगडीत सेमिनार, परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन
⦁ व्हेंडर डेव्हलपमेंट व बीटूबी प्रोग्रामचे आयोजन
⦁ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारतवर भर
⦁ ऑरीकसह इतर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष कक्ष
⦁ सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन
सेमिनारमधून समजणार नवीन प्रवाह
विविध विषयांवरी सरासरी दररोज ३ असे ११-१२ सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत.
⦁ Future Mobility
⦁ International Automotive Industry – Current & Future and Effect on Indian Automobile Industry
⦁ औद्योगिक महाराष्ट्र आज आणि उद्या
⦁ E Vehicles- Opportunities in component Mfg.
⦁ Green Hydrogen – Next Gen. Fuel
⦁ Agriculture Current Scenario in World
⦁ Financials for Industries SIDBI schemes, subsidy, finance etc.
⦁ Exports & Business Opportunities Plastic Industries
⦁ Railway & AURIC
⦁ Skill Development for ITI & Energy & Diploma Students by GIZ
⦁ Self-Made Aurangabad Giants