ग्रामपंचायतमधील केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंचाच्या पतीला दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. याबाबत आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (रा. आलेगाव, ता. सांगोला) यांचेविरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आलेगाव (ता. सांगोला) येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे तक्रारदारास काम मिळाले होते. हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्याने त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायत येथे पाठपुरावा केला.याबाबत आलेगाव येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी अँटीकरप्शन ब्युरो, सोलापूर यांना तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याचे कामाचे आठ हजार रुपये असे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.