विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो. अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात. विठुराया हा गोरगरीब भाविकांचा देव असल्याने कधी देवाला पाळणे, कानातले, नाकातले असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने ( देवाच्या दानपेटीत अर्पण करत असतात. ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात. काही भाविक खरे दागिने अर्पण करतात तर काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूक देखील करत असतात.
दर महिन्याला दानपेटी मोजण्यासाठी उघडल्यावर यात नोटांसोबत असे दागिने देखील सापडतात. अशावेळी या लहान दागिन्यांची तपासणी करण्यासाठी विठ्ठल मंदिराचे सराफ नेहमीच्या पद्धतीने या दागिन्यांची तपासणी करतात आणि जे खरे सोन्या चांदीचे दागिने असतात त्याची नोंद करुन बाजूला ठेवले जातात. जे खोटे दागिने असतात तेही जपून पोत्यामध्ये भरुन ठेवले जातात. सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत. भाविकांनी दागिने खरेदी करताना पावती घेतल्यास त्यांची फसवणूक होणार नसल्याची भावना मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड बोलून दाखवतात.
सध्या देवाकडे 31 किलो सोने आणि 1050 किलो चांदी जमा झालेली असून काही महिन्यांपूर्वी निर्णय झाल्याप्रमाणे लवकरच या अर्पण केलेल्या दागिन्यांच्या सोन्याच्या विटा बनवल्या जाणार आहेत. साधारण दरवर्षी देवाच्या खजिन्यात 3 किलो सोने आणि 200 किलो चांदीची वाढ होत असते. मात्र देवाला श्रद्धेने सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणाऱ्या भाविकांनी स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी सराफाकडून दागिन्यांची पावती घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात मुंबईतील एका महिला भाविकाने पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक कोटी रुपयांचं गुप्तदान दिलं होतं. मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मुंबईतील या विठ्ठलभक्ताचं कोविड19 मुळे जून 2021 मध्ये निधन झालं होतं. विठ्ठलावर असलेल्या श्रद्धेमुळेच त्याने मृत्यूसमयी आपली पत्नी आणि आईला बोलावून निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठूरायाच्या चरणी अर्पण करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली होती. दुर्दैवाने यानंतर काही दिवसांतच या विठ्ठल भक्ताचे निधन झालं. पतीच्या निधनानंतर खरंतर विम्याची येणारी रक्कम विधवा पत्नी आणि लहान मुलींसाठी उपयोगी ठरली असती. मात्र पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या विधवा पत्नीने विमा कंपनीकडून आलेली एक कोटी रुपयांची रक्कम मंदिराला दान केली.