भारतीय सैन्य भरती (अग्नीवीर एंट्री) 2024-2025 साठी पात्र पुरुष उमेदवारांसाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही अधिसुचना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून ऑनलाइन नोंदणी 22 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती संचालक (भरती) कर्नल विक्रम सिंग यांनी दिली आहे.
भरती वर्ष 2024-2025 साठी अग्निवीरांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे. टप्पा एक (ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा) आणि दुसरा टप्पा (भरती रॅली उमेदवाराची चाचणी, कागदपत्रे तपासणी, वैद्यकीय तपासणी) याप्रमाणे राहील. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक, स्टोअर किपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10 वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यांचे रहिवासी (अधिवास) असलेल्या उमेदवारांसाठी होणार आहे.
उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. जे उमेदवार यशस्वीरित्या ऑनलाइन नोंदणी करुन अर्ज सादर करतील त्यांची प्रवेशपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहे. ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (ऑनलाइन CEE) महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार घेतली जाईल.22 एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी संकेतस्थळावर घोषित केली जाणार आहे. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना नियुक्त केलेल्या वेळेत आणि ठिकाणी भरती मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल. याबाबतचा तपशील ‘रॅली अॅडमिट कार्ड’ (नंतर जारी केला जाईल) वर देण्यात येईल. शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अंतिम गुणवत्तेत निवडलेल्या उमेदवारांना राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी बोलावले जाईल. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.