छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाला असून यात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच वित्तीय हानी देखील झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. आगीत दुकानातील फर्निचर, काउंटर, सोफे आणि इतर साहित्य जळाले. मार्केट वस्तीत हे दुकान आहे. दोन कुटुंब वरच्या मजल्यावर होते. खाली लागलेल्या आगीचे लोट आणि धूर वरच्या दिशेने गेल्याने सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यात आसिम वसीम शेख (३ वर्षे मुलगा), परी वसीम शेख (२ वर्षे मुलगी), वसीम शेख (३० वर्षे), तन्वीर वसीम (महिला २३ वर्षे), हमीदा बेगम (५० वर्षे), शेख सोहेल (३५ वर्षे), रेश्मा शेख (२२ वर्षे) यांचा समावेश आहे. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा तसेच अधिक तपास केला जात आहे.
एकूण तीन मजली इमारतीत १६ जण राहत होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.