गुजरात पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नॉर्केटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त कारवाईत आज, शनिवारी गुजरात आणि राजस्थानातील 3 हायटेक लॅबमधून सुमारे 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जब्त केलेत. पोलिसांनी याठिकाणाहून 50 किलो इफेड्रिन आणि 200 लिटर ऍसिटोनसह 7 जणांना अटक केलीय. तसेच याप्रकरणातील मास्टरमांईडचाही पत्ता लागलाय.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, गुजरात आणि राजस्थानमध्ये गुप्तपणे मेफेड्रोन बनवणाऱ्या लॅबची एटीएस गुजरात पोलिसांना माहिती मिळाली. या लॅबचा भंडाफोड करण्यासाठी एटीएस, गुजरात पोलिस आणि एनसीबी मुख्यालय ऑपरेशन युनिटची संयुक्त टीम तयार करण्यात आली होती. गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशनमध्ये, या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची तसेच गुप्त प्रयोगशाळांची सखोल पाळत ठेवण्यात आली. एटीएस, गुजरात पोलिस, एनसीबी-जोधपूर झोन आणि अहमदाबाद झोनच्या संयुक्त पथकांनी शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमाराला राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील भीनमाल, ओसियन येथे एकाच वेळी छापा टाकला. राजस्थानचे जोधपूर आणि गुजरातच्या गांधीनगरहून एकूण 149 किलो मेफेड्रोन (पावडर आणि द्रव स्वरूपात), 50 किलो इफेड्रिन आणि 200 लिटर एसीटोन जप्त करण्यात आले. आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पकडलेल्या लोकांच्या चौकशीच्या आधारे अमरेली (गुजरात) येथे आणखी एक ठिकाण शोधण्यात आले असून तिथे छापेमारी सुरू आहे.
एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेटवर्कच्या म्होरक्याची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल. मेफेड्रोन, ज्याला 4-मिथाईलमेथकॅथिनोन, 4-एमएमसी आणि 4-मिथाईलफेड्रोन म्हणूनही ओळखले जाते, हे ऍम्फेटामाइन आणि कॅथिनोन गटाचे एक कृत्रिम उत्तेजक औषध आहे, हे ड्रग्जच्या जगात द्रोण, एम-कॅट, व्हाईट मॅजिक, ‘म्याऊ म्याऊ’ आणि बबल म्हणूनही ओळखले जाते.