काँग्रेसने नेहमीच राम मंदिराला विरोध केला आहे. त्यात आता शिवसेना त्यांच्यासोबतच जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावून बसली आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप वाईट वाटले असते. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेस कलम ३७० हटवणार असल्याचे सांगत आहे. हे जनतेला मान्य आहे का? तुम्ही जनता हा निर्णय मागे घेऊ देणार आहात का?, मोदींच्या निर्णयाला विरोध करण्याची कुणाची हिंमत आहे का?
महायुतीचे हातकणंगलेतील उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणं मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत बसवण्याचं आवाहन केलं. या सभेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी हजेरी लावली. मोदींच्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी भिडे हे प्रेक्षकांमध्ये पुढच्या रांगेत बसले. या ठिकाणी बसून त्यांनी मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली.
मोदी म्हणाले, कोल्हापूरमध्ये फुटबॉल प्रसिद्ध आहे, असे मला कळलं. त्यामुळे फुटबॉलच्या भाषेतच सांगतो की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर एनडीए आणि भाजपा २-० ने पुढे आहे. तर काँग्रेस आणि इंडी आघाडी शून्यावर आहे. दोन गोल झाल्यानंतर आता कोल्हापूरकडे तिसऱ्या गोलची जबाबदारी आली आहे. कोल्हापूरकर असा गोल करतील की, इंडी आघाडीच्या चारी मुंड्या चीत होतील. दुसरीकडे इंडी आघाडीने देशविरोधी आणि द्वेषाच्या राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत. यामुळे मोदी सरकारच पुन्हा एकदा येणार, हे पक्के झाले आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीचे नेते पहिल्या दोन टप्प्यानंतर गोंधळले आहेत. आता ते ध्रुवीकरणाची भाषा बोलू लागले आहेत. जर देशात काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर ते जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करण्याच्या विचारात आहेत. तसेच सीएए कायदा देखील त्यांना रद्द करायचा आहे. पण मला त्यांना एक सांगायचे आहे. ज्यांचे तीन अंकी आकड्याचे खासदार निवडून आणण्याचे वांदे झाले आहेत, ते सरकारच्या दारापर्यंत तरी पोहचू शकतात का?
इंडी आघाडीचे लोक आता देशावर राग काढत आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये यांचे नेते दक्षिण भारताचे विभाजन करण्याची भाषा वापरत आहेत. पण ते शक्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य’ अशी घोषणा ज्या मातीत झाली, ती माती इंडी आघाडीच्या मनसुब्यांना पूर्ण करून देईल का? त्यामुळे विभाजनवादी भाषा बोलणाऱ्यांना तुम्ही चोख प्रत्युत्तर द्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.