सालाबादप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी केल्यानंतर आज, शनिवारी सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये सुरुवातीला पाऊस कमी असेल आणि उत्तरोत्तर वाढत जाईल. मूग आणि उडीद सर्वसाधारण, तीळ चांगला असेल. दरम्यान यावर्षी आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत वर्तवले गेले नाही. पीकं जोमात असूनही त्यांना अतिवृष्टीचा फटका बसेल, असं भाकीत करण्यात आले.
जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. मांडणीचं भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही बिझनेससाठी येथे गर्दी करतात.
अशी केली जाते घटमांडणी
अक्षय्य तृतीयेला सायंकाळी घटमांडणी करण्यात येते. यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी अठरा प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात येतात.घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात येतात. आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा-पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात येतात.बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात येते. तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान-सुपारी ठेवण्यात येतात. रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकत नाही. त्यानंतर आज सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्री दरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तविले जाते.
वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.
या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलं आहे. पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे. चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे. कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित सांगण्यात आलं आहे.
पीक पाण्याचा नियोजन आणि भाकीत पुढील प्रमाणे
ज्वारी सर्वसाधारण, तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल. यंदा तीळ चांगला असेल. एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल, बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगलं पीक असेल. जवस सर्वसाधारण पीक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल. हरभरा चांगलं पीक मात्र भाव निश्चित नाही.
उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकित करण्यात आलं होतं ते ९० टक्के खरं झालं आहे. यावर्षीच्या भाकितावर आमचा संपूर्ण विश्वास बसलेला आहे.