जिल्हा परिषदेतील दोन हजार ७९५ शाळांवरील जवळपास तीन हजारांहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. नवीन भरतीतून आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्ती मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती केली. पण, लोकसभेच्या आचारसंहितेमुळे अनेकांना नियुक्ती मिळालेली नाही. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या सर्वांनाच नियुक्ती दिली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषद शाळांवरील पूर्वीच्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांची कार्यवाही पार पडणार आहे.
१५ जूनपासून शाळा सुरू होण्यापूर्वी विनंती बदल्या व नवीन शिक्षकांना नियुक्ती, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचा पट १० ते २० दरम्यान असून त्यांना पटसंख्या वाढवावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन आदेशानुसार आता विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, अनेक शिक्षक दूर अंतरावरील शाळांमध्ये जाण्यास तयार नसतात आणि त्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पाडताना जिल्ह्याच्या सीमावर्ती तालुक्यांमधील शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक द्यावे लागणार आहेत.