चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात प्रवेश केला. घरामध्ये जाताना घरमालक आणि भाडेकरुला जाग आली. पळून जाणाऱ्या चोरट्याने हातातली लोखंडी वस्तू भिरकावून घरमालकाच्या डोळ्यावर मारुन जखमी केले.हा फिल्मीस्टाईल प्रकार अक्कलकोट रोडवरील यशराज नगरात पहाटे अडीचच्या सुमारास घडला. नागनाथ दत्तात्रय महाजन (७३) असे जखमीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी अक्कलरोड येथील यशराज नगरात राहतात. वाढत्या उकाड्यामुळे ते व त्यांचे भाडेकरु अंगणात झोपलेले होते.
पहाटे अडीचच्या सुमारास एक अनोळखी २५ ते ३० वयोगटातील तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंडवरुन उडी मारुन अंगणात आला. आवाजाने अंगणात झोपलेले फिर्यादी आणि भाडेकरुंना जाग आली. घराच्या दरवाजाची तोडफोड करुन आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. जागी झालेल्या फिर्यादीने आवाज दिल्याने चोरट्यानं घाबरुन पळ काढताना फिर्यादीच्या दिशेने हातातील लोखंडी वस्तू भिरकावून मारली. यात फिर्यादीचा डोळा निकामी होऊन जखम झाली. एव्हाना चोरटा पसार झाला. सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला असून तपास सपोनि सोळुंके करीत आहेत.