सोलापूर राखीव व माढा मतदार संघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2014 आणि 2019 च्या तुलनेत यंदा वातावरण बदलले असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयाची आशा आहे. कार्यकर्त्यांमधूनही उत्साह पाहायला मिळतो. आमचा उमेदवार विजयी होणार आणि गुलाल आम्हीच उधळणार अशा चर्चेने आता जोर भरला आहे.
गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते हनुमंत कुलकर्णी या दोघांची चर्चा सुरू होती. तोडकर यांनी चार तारखेला दोन्ही ठिकाणचा गुलाल आम्ही उधाळणार असे कुलकर्णी यांच्यासमोर वक्तव्य केले. तेव्हा कुलकर्णी यांनी आता बोलून घ्या काय बोलायचे ते त्या दिवशी बोलायला संधी मिळणार नाही असे म्हणून तोडकर यांना डिवचले.
तेव्हा पुन्हा तोडकर यांनी सोलापूर मध्ये प्रणिती ताई आणि माढ्यामध्ये धैर्यशील भैय्या हेच विजय होणार असा दावा केला. या दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर हवीनाळे त्या ठिकाणी आले त्यांनीही चर्चा ऐकली. तेव्हा त्यांनी तोडकर यांना संबोधन “तुम्ही कुठे गुलाल उधळायचा उधळा परंतु सोलापुरात गुलाल आमचा असणार” राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निश्चित विजय होतील त्यामुळे सोलापूर सह माळशिरस मध्येही गुलाल आम्ही उधळणार असा दावा केला.
राम सातपुते माळशिरस आमदार असल्याने तोडकर यांनी “आम्ही सातपुते यांना कुठे पोहोचवायचं ते पोचवल आहे त्यामुळे सोलापूर आणि माढा या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्याच विजय होतील असा पुन्हा एकदा छाती ठोकपणे सांगितले.
जिल्हा परिषदेमध्ये या नेत्यांमध्ये बराच वेळ विजयाच्या गुलाला वरून जुंपली होती त्यानंतर हे सर्व नेते चर्चा करता करता बाहेरील कॅन्टीन मध्ये चहा घेण्यास निघून गेले.