वादळी वाऱ्यात घराचे व झाडाच्या नुकसानीसंदर्भात पंचनामा झाला किंवा कसे याची विचारणा केली असता, तलाठ्यानं अक्षय कसबे याला जातीवाचक शिवीगाळी केली. हा प्रकार बुधवारी, मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे बुधवारी, सकाळी ११ वा. घडलीय. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तलाठी चंद्रकांत मोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील नरखेड भीमनगर येथील रहिवासी अक्षय जालिंदर कसबे, बुधवारी सकाळी नरखेड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मनोज मोटे व निलेश राऊत यांच्या समवेत थांबला होता. त्यावेळी तेथे आलेले तलाठी चंद्रकांत मारुती मोटे यांना, त्याचा मित्र मनोज मोटे याच्या शेतात वादळ वाऱ्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला का अशी विचारणा अक्षय कसबे यांनी केली. त्यावेळी तलाठी चंद्रकांत मोटे यांनी, कसबे याच्या जातीवर जाऊन मला रस्त्यात अडवून पंचनाम्याची माहिती विचारायला तू काय जहागीरदार आहेस काय, तुमची जात मागून खाणारी, माझ्यावर रुबाब करतोस काय असे म्हणून हाताने चापट मारून तुला काय करायचे आहे ते कर असे म्हटले.
याप्रकरणी अक्षय कसबे याचा जात वर्ग ज्ञात असताना तलाठी चंद्रकांत मोटे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी तलाठी चंद्रकांत मोटे याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.