ठाणे, 22 जून (हिं.स.) येत्या मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल दि. 15 जूनपासून सुरु झाले असून 30 जून 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत फळ पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :-
1. ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. 2. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. 3. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. 4. या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. 5. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. 6. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. 7. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असावे. 8. फळपिक विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. 9. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. 10. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. 11. योजनेत भाग घेण्यासाठी चिकू फळपिकाचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(टोल फ्री नं. १८००२०९५९५९) मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत चिकू पिकाकरीता दि.३० जून आहे, असेही श्री. कुटे यांनी कळविले आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) :- ठाणे जिल्ह्यात चिकू फळपिकासाठी चालू वर्षी विमा संरक्षित रक्कम रु. 70,000/- असून विमाहप्त्यात शेतकरी हिस्सा रु.12250/- इतका आहे.
तालुकानिहाय अधिसूचित महसूल मंडळांची यादी :- चिकू पिकासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव व शहापूर तालुक्यातील किन्हवली व डोळखांब ही महसूल मंडळे अधिसूचित आहेत.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी – जादा आर्द्रता व जास्त पाऊस – दि.१जुलै ते ३० सप्टेंबर.
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) –
1. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रतिदिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त
पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. ३१,५००/- देय राहिल.
2. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त
पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ७०,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु, ७०,०००/-.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुटे यांनी केले आहे.