रत्नागिरी, 23 जून, (हिं. स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी रत्नागिरी वकील संघटनेतील मतदारांना भेटून वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्याचे आवाहनही केले. वकिलांनी श्री डावखरे यांना पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी डावखरे यांनी सांगितले की, वकिली सोडून नकळत राजकारणाच्या प्रवाहात खेचला गेलो. मतदारसंघात पाच जिल्हे आहेत. यात सर्व जिल्ह्यांचे प्रश्न भिन्नभिन्न आहेत. पालघर हा ग्रामीण भाग आहे. नवी मुंबई, कल्याणमध्ये शिक्षणाचा प्रश्न वेगळा आहे, असे सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण, प्रत्येक शाळा डिजिटल करण्याकडे लक्ष दिले. प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले आणि जगाच्या पाठीवर कुठे काय घडते आहे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केल्याचेही निरंजन डावखरे यांनी सांगितले.
कोकणातील मुले हुशार आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी वर्गामध्ये ते मागे पडतात. त्यासाठी त्यांना यूपीएससी आणि एमपीएससीचे शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांतून असे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे डावखरे यांनी सांगितले.
हा मेळावा भाजपचे नेते आणि अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भाऊ शेट्ये यांनी आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, तसेच ॲड. विजय साखळकर, ॲड. धनंजय भावे, ॲड. नीलम शेवडे, ॲड. आशीष घोसाळे यांच्यासह शंभरहून अधिक वकील मतदार उपस्थित होते.