” माझी शाळा सुंदर शाळा अभियान ”
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
विष्णु मगर
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जाफराबाद तालुक्यातून अव्वल ठरलेल्या शाळा 4 महिने उलटले तरी अद्याप बक्षिसाच्या प्रतिक्षेत आहेत.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून भौतिक सुविधा व अन्य बाबीत सरस कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 3 खाजगी संस्थेच्या 3 शाळा निवडण्यात आल्या होत्या.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्रथम क्रमांक भारज बु , द्वितीय खानापूर तर तृतीय क्रमांक कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेने पटकावला होता तर खाजगी शाळेतून ज्ञानसागर विद्यालय सिपोरा अंभोरा प्रथम , द्वितीय टेंभुर्णी येथील स्व.मारोतराव देशमुख विद्यालय तर तृतीय क्रमांक जवखेडा ठेंग येथील राजे संभाजी विद्यालयाने पटकावला होता.तालुका स्तरीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्या शाळांना अनुक्रमे 3 लक्ष, 2 लक्ष व 1 लक्ष रुपये बक्षिसाच्या मानकरी ठरणार आहेत.
सदर स्पर्धेचा निकाल लागून 4 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्याप विजेत्या शाळांना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.सदर शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीत अध्यक्ष म्हणून तत्कालीन गटविकास अधिकारी बी.बी. थोरात, सदस्य सचिव म्हणून वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे, गटशिक्षणाधिकारी सतिश शिंदे, विस्तार अधिकारी रामकुमार खराडे, केंद्रप्रमुख डी. के. सोनुने, शिवाजी फोलाने, डी. पी.
वाघ, अशोक चिंचोले, वसंता शेवाळे, डी. के. खरात, सुधाकर चिंधोटे, गजानन मांटे, बिंदेसिंग सोळंकी, दत्तात्रय नागरे,मुख्याधिकारी संतोष वाघमारे, यांचा समावेश होता.
प्रतिक्रिया :-
सदर अभियानाचा निकाल लागून 4 महिने कालावधी उलटला तरी अद्याप सदर बक्षिसाची रक्कम शाळांना मिळाली नाही.सदर बक्षिसाच्या माध्यमातून शाळा परिसराचा आणखी कायापालट करण्याचे नियोजित आहे.जिल्हा प्रशासनाने तात्काळ सदर रक्कम विजेत्या शाळांना वितरीत करावी
सुभाष तायडे – अध्यक्ष शाळा समिती खानापुर
प्रतिक्रिया :-
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या बक्षिसांची घोषणा होऊन मोठा कालावधी उलटला तरी अद्याप सदर बक्षिसाची रक्कम संबधित शाळांना का देण्यात आली नाही हे न उलगडणार कोड आहे.खर पाहता राज्य स्तरीय स्पर्धेत अव्वल ठरलेल्या विजेत्या शाळांना समारंभपूर्वक सदर बक्षिसे प्रदान करण्यात आलेले आहेत.त्याच पद्धतीने तालुक्यातील विजेत्या शाळांना ही सदर बक्षीस तात्काळ समारंभ पूर्वक प्रदान करावेत.
विनोद कळंबे – चेअरमन,शिक्षक पतसंस्था जाफराबाद