मुंबई, १ जुलै, (हिं. स) राज्यात महायुती सरकारने दोन वर्षाचा स्वप्नपूर्ती ते वचनपूर्तीचा कार्यकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वीकरुन दाखवला. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट सरकारला दुसऱ्या पुण्यतिथीबाबत श्रद्धांजली अर्पण करतो अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. वाघमारे म्हणाले की भ्रष्ट आणि काम न करणाऱ्या सरकारपासून या महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी मुक्तता केली आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले.राज्य कर्जात बुडाले आहे अशी टीका करणाऱयांना कर्जाची खरी बाजु व सरकारने राज्याच्या प्रगतीचा खरा आरसा दाखवला असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दोन वर्षात राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे.”एफडीआय” आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र विरोधकांचा अभ्यास कमी असल्याने त्यांनी कालपासून अर्थसंकल्पाबाबत खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरु केले आहे. राज्यावरील कर्जाच्या बोज्याबाबत डॉ. वाघमारे म्हणाले की, एफआरबीएम कायद्यानुसार राज्याचे कर्ज हे जीडीपीच्या 25% पेक्षा वरती जाता कामा नये असा नियम आहे. मात्र राज्यावर 7 लाख 30 हजार कोटींचे कर्ज असून कर्जाचे प्रमाण फक्त 18.35% इतकेच आहे. त्याशिवाय राज्याला आवश्यक आणखी 1.30 लाख कोटींचे कर्ज घेतले तरी मर्यादेमध्ये ते 21% पर्यंत वाढेल. त्यामुळे राज्यावरील कर्ज नियमात बसणारे आहे, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची उत्पादन क्षमता 15 लाख कोटींवर 38 लाख कोटींच्या घरात गेली आहे. राज्यात कर्ज घेऊन पायाभूत सेवा सुविधांचा विकास सुरु आहे. राज्यात उत्पादन क्षमता वाढत असताना खोट्या बातम्या देऊन दिशाभूल करणाऱ्या विरोधकांनी ब्रेन मॅपिंग करणे आणि अभ्यास करुन सरकारवर विधीमंडळाबाहेर टीका करावी, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगवला.
ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला या म्हणीप्रमाणे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांची अवस्था झाली आहे. उबाठा नेते संजय राऊत विजय वडेट्टीवारांना कुठेतरी चावले असावेत, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. ते म्हणाले की, वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करुन राज्य उद्धस्त केले म्हटले होते. यावरुन विरोधीपक्ष नेत्यांच्या हुशारीची किव करावीशी वाटते, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केलेली टीका म्हणजे नवा जावईशोध आहे. काँग्रेसने जाहीर केलेले 8500 रुपये हे कागदावर होते. ते कोणाला दिले नाही याउलट आमचे सरकार महिलांच्या खात्यात 1500 रुपये देतोय त्यामुळे नानांनी सरकारवर 40% कमिशनचा केलेला आरोप म्हणजे जावईशोध असल्याची टीका केली. विरोधीपक्ष नेत्यांना हप्ते मिळत असल्याने त्यांना काँन्ट्रॅक्टरच्या बिलांची काळजी लागली आहे, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी ज्येष्ठांसाठी तिर्थक्षेत्रांचा दौरा का नाही आणली, पण त्यासाठी डोक्याचा भाग लागतो जो विरोधकांकडे अजिबात नाही. फक्त बडबड करायची, रडायची आणि लोकांना खोटं सांगून त्यांचे नुकसान कसे करता येईल, यासाठी सगळे विरोधक तडफडून जागे झाले आहेत.
दोन वर्षातील महायुती सरकारचे काम आणि अर्थसंकल्पातील सर्व योजना या समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होईल, अशी खात्री असल्याने विरोधक अर्थसंकल्पावर बेताल बडबड करत आहे, असे डॉ. वाघमारे म्हणाले.
*उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी*
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवारांनी सामायिक चेहरा असावा असे म्हटले आहे तर काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा तूर्त चेहरा जाहीर करण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली आहे.उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सुरु असल्याची टीका डॉ. वाघमारे यांनी केली. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले