…… (मानवी आरोग्य धोक्यात ; धुरांमुळे फळबागांवर परिणाम)…… मंठा/ प्रतिनिधी : मंठा शहरालगत असलेल्या अनेक अनधिकृत वीट भट्ट्यांमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असून त्यातून निघणाऱ्या धुरांचा फळबागावर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. सन 2023 – 2024 या वर्षात मंठा तालुक्यातील वीटभट्टी धारक यांनी वीटभट्टीसाठी वृक्षतोड बंदी असलेल्या झाडांची कत्तल करून लाकडी वापरली तसेच मुरूम माती विनापरवाना वापरण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
अशा विनापरवाना वीटभट्टी धारकांवर मागील वर्षभरात एकही कारवाई महसूल प्रशासनाने केली नाही हे विशेष ! शहर व परिसरातील वाढत्या बांधकामासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विटांच्या भट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वीटभट्टी चालकां कडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येते. वीटभट्टी परिसरातील रहिवाशांचा वीटभट्टीच्या धुरामुळे श्वास कोंडला जात असून फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
वीटभट्टीच्या माध्यमातून गौण खनिजपोटी महसूल विभागाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल वीटभट्टी धारकांनी बुडवला आहे. शहरालगतच्या वीटभट्टी धारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे समजते. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते तर काही शेतकरी माती विकतात त्यालाही शासकीय परवानगी असणे आवश्यक असते, तसेच वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना वीट भट्टी धारकांनी शासकीय नियमांचे पालन केलेले आढळून येत नाही. यातच वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंठा शहरालगत असणाऱ्या सर्व अनधिकृत वीटभट्ट्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि आतापर्यंत बुडवलेला महसूल जमा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.