अमरावती , 11 जुलै (हिं.स.) : मुंबई येथे मंत्रालयासमोर ऑनलाइन जुगार बंद करण्याच्या आंदोलनाकरिता गेलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी प्रथम आपल्या मतदारसंघातच लक्ष द्यावे. परतवाडा येथे प्रहार पक्षाचा अध्यक्ष हा खुलेआम वरली मटका व्यवसाय करतो. त्यावर परतवाडा पोलीस ठाण्यात कित्येक गुन्हे दाखल आहेत, असा आरोप करीत आधी चांदूरबाजार, अचलपूरमधील जुगार व अवैध
धंदे बंद करावे, असा टोला बबलू देशमुख यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे. प्रहारचा संबंधित कार्यकर्ता स्वतः परतवाडा आणि अचलपूरमध्ये वरली मटका व्यवसाय व क्रिकेट सट्टा चालवतो.
त्यावर कित्येकदा पोलिसांची धाड टाकली असून परतवाडा, अचलपूर, अमरावती शहरातसुद्धा जुगार चालवण्याचे गुन्हे दाखल आहेत. यावर कधी स्थानिक आमदाराने लक्ष दिले काय ?, असा सवाल करीत अचलपूर, परतवाडा येथे चालू असलेले अवैध धंद्यामध्ये आमदारांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. आमदारांनी मुंबई येथे आंदोलन करण्यापेक्षा अचलपूर, परतवाडा, चांदुरबाजारमध्ये या प्रकारचे आंदोलन करावे. अचलपूर मतदारसंघाच्या चांदूरबाजार तहसीलमधील तळणी, तामसवाडी येथे वाळू तस्करी करणारासुद्धा आमदाराचा खंदा समर्थक आहे.
ही गोष्ट तालुक्यात सर्वांना माहित आहे. या मतदारसंघात दोन नंबरचे धंदे उभारून व प्रशासनावर दबाव तंत्राचा उपयोग करून अवैध धंदेवाल्यांना व गुंड प्रवृत्तीच्या असामाजिक तत्त्वांना मोठे करण्याचे काम या नौटंकीबाज आमदाराकडून होत असल्याचा आरोप देखील यावेळी बबलू देशमुख यांनी केला. अचलपूर मतदारसंघात वरली मटका, क्रिकेट सट्टा, अवैध गौण खनिज, धान्याची तस्करी असे विविध अवैध धंदे चालत असतान मंत्रालयात जाऊन ऑनलाईन जुगार बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा काय उपयोग, असा टोला देखील यावेळी बबलू देशमुख यांनी बच्चू कडू यांना लगावला.