केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांनुसार बीबीसीची डॉक्यूमेंट्री “इंडिया: द मोदी क्वेश्चन” चा पहिला भाग ज्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता त्या चॅनेलवरुन ब्लॉक करण्यात आला आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार यूट्यूब व्हिडिओनंतर केंद्रानं ट्विटरला देखील संबंधित यूट्यूब व्हिडिओची लिंक असलेली ५० हून ट्वीट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ नुसार आपत्कालीन स्थितीत प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करुन सचिव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्याकडून यासंबंधी निर्देश जारी करण्यात आले होते. त्यानंतर बीबीसीच्या त्या डॉक्युमेंटरीच्या भागासंदर्भातील भाग यूट्यूब आणि ट्विटरवरील लिंक्सची माहिती घेण्यात आली होती.
बीबीसी नं २००२ च्या गुजरात दंगलीच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर भाष्य केलं होतं. बीबीसीनं दोन भागांची डॉक्यूमेंट्री बनवली होती. यासंदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर डॉक्यूमेंट्री विविध प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आली होती.
भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात बीबीसीनं बनवलेल्या डॉक्यूमेंट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. हा अपप्रचाराचा भाग असल्याचं भारताकडून सांगण्यात आलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी अरविंद बागचिम यांनी देखील बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर आक्षेप घेतला होता.
बीबीसीनं यासंदर्भात बोलताना डॉक्यूमेंट्री “इंडिया: द मोदी क्वेश्चन” योग्य संशोधनानंतर डॉक्यूमेंट्री बनवण्यात आली असून महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा निष्पक्ष भूमिकेतून करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) च्या एका प्रवक्त्यानं “डॉक्यूमेंट्री साठी उच्च संपादकीय मूल्यांचा आधार घेत संशोधन” करण्यात आल्याचं म्हटलं होतं