मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला 288 पैकी 223 जागांवर विजय आणि निर्णायक आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस, शिवसेना-उबाठा आणि राष्ट्रवादी-शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला (मविआ) 53 जागा मिळत असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेल्या यशात भाजपला 129, शिवसेना (शिंदे गट) 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना 40जागांवर यश मिळाले आहे. तर मविआचे घटक पक्ष असेले शिवसेना (उबाठा) 21, काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अन्य 12 जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी यश मिळवले. काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. प्रमुख विजयी उमेदवारांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, यांचा समावेश आहे.
तर प्रमुख पराभूत उमेदवारांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, बच्चू कडू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा समावेश आहे. राज्यातील अनेक जागांवरील मतमोजणी अजूनही सुरू आहे. मात्र, निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत महायुतीने चित्र बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी महायुतीने फक्त 17 जागा जिंकल्या होत्या.