तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमता शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्यादृष्टिकोनातून घडवावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित ‘उद्यमशाळा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उद्योजिका चंद्रिका चौहान, सेवावर्धिनीचे गिरीश देगावकर, शिवरत्न पवार, विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. विकास पाटील, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, सिनेट सदस्य रोहिणी तडवळकर, शशिकांत चव्हाण, इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी, विनायक बंकापूर, चन्नवीर बंकुर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, सेवावर्धिनी, स्वदेशी जागरण मंच, साविष्कार या संस्था सहआयोजक आहेत. एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता.
पालकमंत्री श्री गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला, याचे खरच कौतुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत आग्रही आहेत. यासाठी विविध योजना आहेत. त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शिक्षकांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत संस्कार करण्याबरोबरच त्याबाबत मानसिकता तयार करावी, असे आवाहन देखील पालकमंत्री गोरे यांनी यावेळी केले.