तभा फ्लॅश न्यूज/ नवीन नांदेड : दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील भांडारकर यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चादरम्यान दिव्यांगांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून बेरोजगार दिव्यांगांना तीनचाकी स्कुटी, झेरॉक्स मशीन, संगणक, कलर प्रिंटर आणि इतर रोजगारपूरक उपकरणे देणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी खात्यात जमा करणे, आरपीडब्ल्यू कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, तसेच केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेतून निकृष्ट दर्जाच्या तीनचाकी सायकली ऐवजी इलेक्ट्रीक स्कुटी देणे यांचा समावेश होता.
तसेच “आमदार दिव्यांगांच्या दारी” हा उपक्रम राबवून मतदारसंघातील तळागाळातील दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चात सहभागी बांधवांनी समस्यांचे सभागृहात मांडून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवासात अंध आणि मुकबधीर दिव्यांगांना सुद्धा ४० टक्के दिव्यांगत्वावर वनफोर्थ तिकिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारच्या विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांनी दिव्यांगाच्या वरील सर्व मागण्या लागू करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर अल्पउपहारा नंतर मोर्चा मागे घेण्यात आला.