मुंबई – गेल्या तीन महिन्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव व मनसे प्रमुख राज या ठाकरे बंधूतील मनोमिलनातील गोडवा दिवसोदिवस वाढत चालला आहे. त्यांच्यातील ‘ऑपरेशन मिलाफ’ मोहिमेमध्ये रविवारी आणखी एक पुढचे पाऊल पडले. राज ठाकरे यांनी आपली आई, पत्नी, मुले,बहिणीला दादूच्या वांद्रेतील मातोश्री निवासस्थानी सफर घडवून आणली. दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र स्नेहभोजन केले.
ही कौटुंबिक स्वरूपाची भेट असल्याचे राज यांनी सांगितले. मात्र दीर्घकाळ रंगलेल्या या भेटीत दोन्ही भावंडानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युतीबाबत सकारात्मक चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनापासून उद्धव व राज ठाकरे हे विविध सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने वारंवार एकत्र येत आहेत. पहिल्यांदा पाच जुलैला वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते एकत्र आले त्यानंतर गेल्या तीन महिन्यात तब्बल 6 वेळा त्यांनी विविध कार्यक्रम व कौटुंबिक कारणास्तव एकमेकांशी दीर्घकाळ चर्चा केली आहे. विशेष म्हणजे आजच्या स्नेहभोजनासाठी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती अभय देशपांडे हे उपस्थित होते. राज यांच्या आईनी तब्बल दोन दशकाच्या खंडानंतर मातोश्रीचा उंबरडा ओलांडला.
. मातोश्रीच्या गेटवर माध्यमाशी बोलताना राज यांनी ही कौटुंबिक भेट असून ‘माझी आई देखील सोबत आहे. यात राजकीय काही नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान या भेटीची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगत राहिली.
सुरुवातीला हे दोन भाऊ 5 जुलै रोजी वरळी डोम येथे हिंदी सक्ती विरोधातील कार्यक्रमात एकत्र आले. त्याच महिन्याच्या अखेरीस राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. पुढे ऑगस्टमध्ये गणपती उत्सवादरम्यान उद्धव यांनी सपत्नीक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. पुढे या भेटी होत राहिल्या. मात्र, त्याला स्नेहभोजनाचा तडका हा संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने मिळाला.
भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा : 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातीचं बारसं झालंय. या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर एकत्र आले होते. या कौटुंबिक कार्यक्रमानंतर दोन्ही ठाकरे बंधू थेट मातोश्रीवर गेले होते.