पंढरपू – येथील तालुका पोलिसांनी सोमवारी पहाटे अवैध वाळू उपसा होत असलेल्या तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोलीभोसे येथे अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाई मध्ये जेसीबी, हायवा ट्रक आणि तीन ट्रॅक्टर असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती येथील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भातील तालुका पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर तालुका पोलिसांनी तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे चिंचोली भोसे या भागात अवैध वाळूचा उपसा होत आहे अशा माहितीवरून या गावांमध्ये सोमवारी (दि.१३) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाई मध्ये वैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे जेसीबी त्याचप्रमाणे अवैध वाळू भरलेले हायवा ट्रक, तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी अशी एकुण पाच वाहने व एकूण पंधरा ब्रास वाळू असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला.
या बरोबरच या कारवाई वेळी धनाजी गंगाधर दगडे (वय ३६वर्ष रा.गुरसाळे ), विजय उर्फ राजू शंकर आढागळे (रा.गार्डी ), उमेश बाबुराव बोबडे ( रा.गुरसाळे ), गणेश बापू सोनवणे (रा.चिंचोली ),शंकर नवनाथ नवगिरे (रा.चिंचोली ) आणि किशोर शिवदास आवटे (रा. चिंचोलीभोसे) असे एकूण सहा संशयीत आरोपी विरुद्ध बीएनएस कलम ३०३, बीएनएस कलम ३०५ बीएनएस कलम ३,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या वाळू तस्करीच्या गुन्ह्यातील या सर्व आरोपींच्या विरोधात त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्याचा अभिलेख अवलोकन करून त्यांच्यावर कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे,सहाय्यक फौजदार आबा शेंडगे, पोलीस हवालदार घंटे, पोलीस हवालदार सय्यद,पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम, पोलीस कॉन्स्टेबल गुटल,पोलीस चालक नदाफ आणि घाडगे यांच्या पथकाने केल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली.
–महेश भंडारकवठेकर १३-१०-२०२५–