सोलापूर – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पर्यावरण पूरक आणि आकर्षक अशा मातीच्या आकाश दिव्यांची निर्मिती करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असून नव्या पद्धतीच्या आकाश दिव्यांची सोलापूरकरांमधून क्रेझ वाढलेली दिसत आहे. नीलम नगरातील नागनाथ कुंभार आपल्या कारखान्यात वैविध्यपूर्ण असे कलाकृतीने नटलेले आकाशदिवे बनवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
कोरोना काळापासून पारंपारिक अशा भारतीय बनावटीचे आकाशदिवे सोलापूरकरांच्या घरात एक वेगळे स्थान निर्माण करत आहेत. टिकाऊ स्वरूपाचे असणारे हे मातीचे आकाश दिवे आता नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून याची तयारी कुंभार करत आहेत. मातीचा आकाश दिवा बनवण्यासाठी हैदराबाद, पंढरपूर आणि बेळगावची माती पंधरा दिवस एकत्रित भिजवून त्यानंतर हे आकाश दिवे बनवले जात आहेत. वेग वेगळ्या आकारात आणि नक्षीकामात आकाशदिवे बनवून त्यावर रंगकाम केले जात आहे.
सोलापूर सह कर्नाटक आंध्र आणि मराठवाड्यामध्ये या पर्यावरण पूरक मातीच्या आकाश दिव्यांची मागणी आजही कायम आहे.
कोट
मातीच्या आकाशदिव्यांची क्रेझ कायम
गेल्या तीन-चार वर्षांपासून मातीचे आकाशदिवे बनवत आहे. पर्यावरणपूरक असे मातीचे आकाश दिवे बनवण्यासाठी एक महिना अगोदरपासून तयारी केली जाते. मातीच्या लगदा तयार करून मशीनद्वारे त्याला आकार दिला जातो. त्याची किंमत ८० रुपये ते १८० रुपये इतकी आहे. १ इंच ते ५ इंची अशी त्याचा आकार आहे.
– एन.कुंभार कारागीर
कोट
टिकाऊ स्वरूपाचे असणारे आकाशदिवे
मातीचे आकाशदिवे टिकाऊ स्वरूपाचे आहेत. त्याचा प्रकाश देखील उत्तम पडतो. दिवाळीनंतर देखील ते आपण सजावटीसाठी लावून ठेऊ शकतो.
– शीतल पाटील, ग्राहक