धाराशिव – यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पिक वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला…एक हात मदतीचा ग्रुप..
धाऊन आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २२ कुटुंबांना १ लाख १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात त्या कुटुंबांचा आधार बनला आहे.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांवर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी व नागरिक वाहून गेले. त्याबरोबरच शेतातील उभी पिके देखील मातीसह वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व पिक उध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारस सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाइकांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ती मदत पोहोच केली आहे. ही मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, न्यूज 18 लोकमतचे संपादक विलास बडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांचे मार्गदर्शन लाभले. हा ग्रुप नामपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. गेल्या ९ वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यां समवेत वाढदिवस साजरा करणे व इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापणीस, रोहिदास कापणीस, महेश कापणीस, अमोल पाटील, अविनाश मोरे व हर्षल कापडे, राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
……
या आपतीग्रस्त कुटुंबियांना केली मदत
एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन पोहोच केली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये श्वेता शरद गंभीर व उमेश विधाते (कारी), बाळासाहेब भोसले (रऊळगाव), अर्चना उमाकांत संकपाळ (गौडगाव), बाळासाहेब पवार (संगमनेर), लक्ष्मण पवार (म्हात्रेवाडी), श्रीरंग दराडे (भालगाव), लक्ष्मण कढपे (झरेगाव), प्रकाश लोंढे (आवाड शिरपुरा), लक्ष्मण गावसाने (दहिटणा), मोहन बोरगावे (उंबरे गव्हाण), बालाजी मोरे (नागूर), उमेश ढेपे (अणदुर), चंद्रशेखर लोखंडे (जवळगा मेसाई) आदींसह इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.