मुंबई : योग्य माहिती कोर्टापासून लपवून ठेवणाऱ्या एका याचिकाकर्त्याची उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढीत तब्बल 50 लाखांचा दंड ठोठावला. स्वामित्व हक्काच्या एका प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी शोबान ठाकुरला दोषी ठरविले .न्या. आरिफ डॉक्टर यांनी मंगळवारी त्याबाबतचे आदेश दिले.
शोबान ठाकूर हे एका चप्पल कंपनीचे मालक आहेत. दिल्लीतील विक्रेता चैतन्य अरोरा आणि सोनू शाह यांनी आपला ट्रेड मार्क वापरू नये, अशी मागणी करणारी याचिका शोबान यांनी हायकोर्टात दाखल केली होती. त्याची दखल घेत हायकोर्टानं 30 जून रोजी ठाकूर यांचा ट्रेड मार्क वापरण्यास मनाई करत अरोरा आणि शाह यांच्या अपरोक्ष मनाई आदेश जारी केले होते. या आदेशांची माहिती मिळताच दिल्लीस्थित व्यापाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच याचिकाकर्त्यांनी कोर्टाची दिशाभूल करत आपल्या अपरोक्ष हे आदेश मिळवल्याचा दावा केला. शोबान यांच्या चप्पल ट्रेड मार्कची केवळ महाराष्ट्रापुरतीच नोंदणी झालीय. आम्ही त्यांच्या आधीपासून हा ट्रेड मार्क वापरत आहोत, असं अरोरा आणि शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अरोरा हे आधीपासून हा ट्रेड मार्क वापरतायत हे त्यांनी कोर्टात पुराव्यांनिशी सिद्ध करीत दिलेल्या मनाई आदेशांमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.. आपल्या ट्रेड मार्कची नोंदणी ही केवळ महाराष्ट्रापुरतीच होती, ही बाब याचिकाकर्त्यांनी कोर्टापासून लपवून ठेवली होती. अशा प्रकारे कोर्टाची दिशाभूल करणं खपवून घेतलं जाणार नाही, असे न्या. आरिफ डॉक्टर यांनी स्पष्ट करीत सत्य माहिती असूनही ते दडवणं आणि दिलेला दिलासा कायम ठेवण्याची मागणी केल्याबद्दल ठाकूर यांना दोषी ठरवत चैतन्य अरोरा आणि सोनू शाह यांना एका महिन्यात प्रत्येकी 25 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे दिले.



















