घनसावंगी : उसाच्या राजकारणातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यशस्वी ठरलेल्या समृद्धी साखर कारखान्याने १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी करून ‘समृद्धी’च्या दुसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. रविवारी गाळप हंगाम २०२५-२६ च्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात, १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ संत-महंत आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना उसाची चिंता करू नका, एप्रिलअखेर उसाचे टीपरुही गाळपाविना राहणार नाही. अशा शब्दात कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
*या कार्यक्रमास समृध्दी कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, बळीराम महाराज राठोड, सुरेश महाराज रामदासी, योगीराज कैलासनाथ महाराज, सतीश महाराज जाधव, घृष्णेश्वर कारखान्याचे संचालक सतीशराव चव्हाण, प्रभाकर पवार, एकनाथराव दुधे, अंकुशराव उढाण, मार्केट कमिटीचे उपसभापती अरुण घुगे, संचालक बालाजी खोजे, शिवाजीराव कटारे, पांडुरंग भांगे, भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे, नामदेव ढाकणे, भगवान बर्वे,अनिरुद्ध झिंजुर्डे, नकुलजी तनपुरे, भगवानराव घाटूळ, बाळासाहेब बोरकर, संचालिका वैशालीताई घाटगे, रिंकीताई मेठी, ज्येष्ठ संचालक दिलीप मामा फलके, रणजीत उढाण, अभिजित उढाण, विकी शिंदे, जीवनराव वगरे , जीवन वगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.*
घनसावंगी-अंबड परिसरात अतिरिक्त उसाचा प्रश्न दरवर्षी चिंतेची बाब बनतो. ऊस उत्पादक शेतकरी राजकारणाचा बळी पडत असल्याने हा प्रश्न कायमचा मिटवून शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याने आपली क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी करणार आहेत. “ऊस उत्पादक शेतकरी आमच्यासाठी विठ्ठल आहेत. समृद्धी कारखाना खाजगी असला तरी त्याचे खरे मालक शेतकरीच आहेत. निवडणुका येतात-जातात, पण समृद्धी साखर कारखाना उसाचे राजकारण करत नाही, आणि करणारही नाही. कारण हा कारखाना माझं तिसरं अपत्य आहे. तो कष्टकरी कामगार- शेतकऱ्यांचे प्रेम,विश्वास आणि कष्टातून उभा राहिला आहे,” असे सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले .
——–
समृध्दी मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून उदयास येईल–
“समृध्दी साखर कारखाना मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणारा दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना आहे. मागील वर्षी २९०० तर यावर्षी समृद्धीने २९७० रुपये एवढा उच्चांकी भाव दिला. येणाऱ्या काळात स्व:ताचा विक्रम मोडून समृध्दी कारखाना मराठवाड्यातला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून उदयास येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपाची घाई करू नये, बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊन आर्थिक नुकसान करू नये” असे माझे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राहील.
-सतीश घाटगे , चेअरमन समृद्धी शुगर्स लि.




















