सोलापुर – सोलापूर विजयपूर महामार्गावरील हत्तूर ते सोरेगाव पर्यंत असणार्या साईडपट्टीवर गवत व काटेरी झुडुपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. सोलापूरसाठी असणारी जलवाहीनीही साईडपट्टीलगत आहे. त्यामुळे गवत काढून रस्ता खुला करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
सोलापूर विजयपूर महामार्गावर दुचाकी, चारचाकी व प्रवाशी बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. या महामार्गावरून कर्नाटकसह इतर राज्यात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. म्हणून दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करून रूंदीकरण करण्यात आले. मात्र यावेळी ठेकेदारांनी साईडपट्टी न केल्याने त्या ठिकाणी शेतकरी शेतातील गवत व माती टाकत आहेत. सोलापूरसाठी असणार्या पंप हाऊसमधून पाणी सोडण्यात येते. ते पाणी घेण्यासाठी शेतकरी साईडपट्टी खोदून रस्त्यावर माती टाकतात. त्यामुळे या मातीवर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच काटेरी झुडुपे वाढल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
हत्तूर ते सोरेगावपर्यंत शहरातील वाहनांची वर्दळ असते. शिवाय नोकरीसाठी ये जा करणार्या नोकरदारांचीही संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद व व्यापारासाठीही वाहनचालकांची वर्दळ सुरू असते. प्रवाशी बस व चारचाकी वाहने एकाचवेळी रस्त्यावरून जात असल्यास दुचाकीस्वाराना बाजूला वाहन घेण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे गवत काढून रस्ता खुला करण्याची मागणी होत आहे.
…
…
जीवघेणा प्रवास
…
हत्तूर ते सोरेगाव पर्यंतच्या रस्त्यावरील साईडपट्टीच नसल्याने रात्री वाहने चालविताना खूप त्रास होत आहे. शेजारी पाण्याचा खड्डा व सोलापूरची जलवाहीनी असल्याने दुचाकी बाजूला घेणे जीवघेणा ठरत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात घडले आहेत. म्हणून साईडपट्टीवरील गवत काढून रस्ता खुला करावे.
शिवानंद बंडे, सरपंच नांदणी,
तालुका दक्षिण सोलापूर




















