अकलूज : शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया अधिक भक्कम करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत 2.0 तसेच सुवर्णजयंती नगरोत्थान या योजनांअंतर्गत तब्बल 331 कोटी रुपयांच्या विकासकामांची सुरूवात होत असून, या प्रकल्पांमुळे अकलूज शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
अकलूज नगरपरिषदेअंतर्गत अमृत 2.0 योजनेअंतर्गत 211.54 कोटींचा निधी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला आहे. सध्या शहरात आधुनिक पाईपलाइन टाकण्याचे काम वेगाने सुरू असून, नागरिकांना अखंड, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी पाच नव्या पाणीटाक्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहणार आहे.
याचबरोबर, सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत 120 कोटींचा निधी अकलूज शहरातील रस्ते बांधकाम, सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील चार प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन आज पार पडले असून, हे रस्ते आधुनिक दर्जानुसार काँक्रीट स्वरूपात बांधले जाणार आहेत.
या सर्व विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील आणि सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
शहरातील आजी-माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. भूमिपूजनानंतर झालेल्या थोडक्यातील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शहराच्या विकासासाठी एकदिलाने सहकार्याचे आवाहन केले.
या वेळी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, अकलूजने नेहमीच प्रगतीचा मार्ग निवडला आहे. या योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा, रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून, अकलूज हे राज्यातील आदर्श शहर बनविण्याचा संकल्प आपण आज प्रत्यक्षात आणत आहोत.
या दोन्ही योजनांमुळे अकलूज शहराचा विकास केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष वास्तवात उतरणार आहे. जलसंधारण, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या क्षेत्रात मोठी सुधारणा घडून येणार आहे. नागरिकांमध्ये या उपक्रमांविषयी आनंदाचे वातावरण असून, शहर प्रगतीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
*वाहतुक शिस्तीची चळवळ उभी करा – खा.धैर्यशील मोहिते-पाटील*
अकलूजचा विकास हा आपल्या संस्कारांमध्ये आणि शिस्तीतही दिसला पाहिजे. स्वच्छता आणि वाहतूक शिस्त ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाहतूक शिस्तीबाबत देण्यात आलेली शपथ सर्वांनी काटेकोरपणे पाळणे गरज आहे. त्यासाठी आपण सर्व मिळून ‘वाहतूक शिस्त चळवळ’ उभी करूया आणि अकलूजला खर्या अर्थाने आदर्श शहर बनवूया.




















