जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह सावदा परिसरात आज सकाळी दहा वाजून 37 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. भुसावळ शहरातील नागरिकांनी सकाळी घरांना हादरे बसले, शिवाय काहीतरी वस्तू मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले तर काही इमारतींमधून नागरिक तात्काळ बाहेर पडल्याचे सांगितले जाते.
जळगाव जिल्ह्यात भुसावळसह सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रिश्टर स्केल वर 3.3 इतक्या तीव्रतेचा हा भूकंप झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजून 37 मिनिटांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह सावदा परिसरात हे धक्के झाल्याची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेत झाल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र नाशिकच्या मेरी येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही नोंद मुंबई केंद्रात होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही, मात्र भूकंप पुन्हा जाणवल्यास त्यापासून बचाव करण्याच्या ज्या सूचना शासकीय पातळीवर देण्यात आल्या आहे. तसेच भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, धक्का जाणवताच लगेच घराच्या बाहेर पडावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करण्यात यावे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे. शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातदेखील दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आज सकाळी अचानक घर हलल्यासारखे, भांडे पडल्याचा अनुभव काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.