माढा : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा १६ वा गळीत हंगामाचा शुभारंभ परमपूज्य स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी यांचे शुभहस्ते तसेच माजी आमदार व कारखान्याचे संस्थापक चेअरमन ॲड.धनाजीराव गणपतराव साठे यांचे अध्यक्षतेखाली तसेच व्हाईस चेअरमन सुधीर पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी श्री सत्यनारायण व काटा पुजन कारखान्याचे संचालक मधुकर चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई चव्हाण या उभयंताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीसंत कुर्मदास महाराज, सहकार महर्षी स्व.गणपतराव साठे, स्व. विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी यावेळी सांगितले की, कारखाना चालविताना अडचणी निर्माण होत आहेत. परंतु आलेल्या अडचणी मधून मार्ग काढून ऊस उत्पादक सभासद शेतक-यांच्या सहकार्याने व विश्वासास पात्र राहून कारखाना प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.हंगाम २०२५-२०२६ साठी ३.५० लाख में.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने कारखान्याची मशिनरी तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज आहे.
यावर्षी नुकतेच सिना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असा ऊस प्राधान्याने गाळप करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतक-यांनी आत्तापर्यंत चांगले सहकार्य केलेले असून,चालू हंगामाचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस श्री संत कुर्मदास कारखान्यास गाळपासाठी देवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी स्व.विलासरावजी देशमुख ऊस विकास कार्यक्रमा अंतर्गत अल्प खर्चात शाश्वत ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञानाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याचा ऊस उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.भविष्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये जोड प्रकल्प असेल तरच कारखानदारी फायद्याची ठरणार आहे. त्यादृष्टीने लवकरच मशिनरी विस्तारीकरणाबरोबरच १४ मे.वॅट सहवीज निर्मिती व प्र.दिनी ५ मे.टन सी.बी.जी प्रकल्पाची उभारणी केली जाणार असल्याचे सांगितले.
कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणा-या ऊसासाठी आसपासच्या इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यात येणार असल्याचे सांगून, कामगारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १५ दिवसाच्या पगाराची रक्कम बोनस म्हणून देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे.असे यावेळी त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मा.आमदार व कारखान्याचे संस्थापक चेअरमन ॲड.धनाजीराव गणपतराव साठे,व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, बी.डी.पाटील, संचालक भालचंद्र पाटील, हरिदास खताळ,दादासाहेब साठे, राहुल पाटील, विजयसिंह पाटील, मधुकर चव्हाण, नारायण गायकवाड, नगराध्यक्षा अॅड मिनल साठे उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,कोमल करळे, नगरसेवक अजिनाथ माळी,अरुण कदम, श्री.विकास साठे,नितीन साठे,
ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक राहुल पाटील यांनी मानले.तर सुत्रसंचालन ॲड समाधान लटके यांनी केले.

















