मंगळवेढा – मरवडे येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून 2 लाख 64 हजार 100 रुपये किंमतीची वाहने व रोख रक्कम जप्त करुन राजाराम तेली,सिताराम बागल,सुभाष जगताप,नंदू जाधव,गणेश जाधव,लखन खरात आदींवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मरवडे येथे शहाजान मुजावर यांच्या घरा शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही लोक गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी पोलीसांचे पथक पाठवून खातरजमा केली असता दि.22 रोजी 4.40 वाजता वरील सहा आरोपी गोलाकार बसून हातामध्ये पत्त्याची पाने घेवून समोर कागद,पेन व पैसे ठेवून जुगार खेळत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.
यावेळी पोलीसांनी गराडा घालून इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नंदू जाधव,गणेश जाधव,लखन खरात हे तिघे फरार होण्यात यशस्वी झाले होते. पोलीसांनी उर्वरीत इसमांची अंगझडती घेवून तपासणी केल्यावर पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला. रोख रक्कम 4 हजार 100,1 लाख 30 हजार रुपये किंमतीची होंडा युनीकॉर्न मोटर सायकल,60 हजार रुपये किंमतीची बजाज प्लाटीना गाडी,30 हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटर सायकल,40 हजार रुपये किंमती स्कुटी व पत्त्याची पाने असा एकूण 2 लाख 64 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी यावेळी जप्त करुन वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मध्यंतरी मरवडेत चालणार्या जुगाराची माहिती पंढरपूर येथे कार्यरत असलेल्या तत्कालीन प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी छापा टाकून मोठी कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली होती. तद्नंतरही अद्याप जुगार अड्डे सुरुच असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. बोराळे बीटचे पोलीस अधिकारी यांनी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना तसे न झाल्यामुळे हे अवैध धंदे सुरु असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

















