लातूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वात भारत प्रगतीच्या दिशेने मार्गोत्क्रमण करत आहे. त्यामुळे ज्यावेळी १५ ऑगस्ट २०४७ साली आपण आपल्या देशाचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश म्हणून जगासमोर आलेला असेल असे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले. लातूरच्या केशवराज विद्यालयात मंगळवारी सकाळी वैकुंठ चतुर्दशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी अॅड. शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, संजय गुरव,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अॅड. आशिष शेलार यांच्या समोर श्रीमदभगवद्गीतेच्या १२ व्या आणि १५ व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. केशवराज विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल राज्याचा सांस्कृतिक मंत्री या नात्याने शासनाच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असे सांगून अॅड. आशिष शेलार पुढे म्हणाले की, गुरुजन आणि आई - वडील यांच्याकडून मिळालेल्या संस्काराने विद्यार्थी समृद्ध बनतात. संस्कार हे छोट्या छोट्या गोष्टीतून घडत असतात. आजचे जग माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे विज्ञानाची भाषा शिकण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या संस्काराची वीण मजबूत असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदींनी श्रीमद्भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित केला आहे. आज आपण केशवराजमध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक श्रीमदभग्वदगीता पठण ऐकून उद्याची पिढी, उद्याचा भारत कसा असेल हे बघायचे असेल तर लातूरच्या केशवराज विद्यालयात जाऊन बघा, असे प्रत्येकाला आवर्जून सांगणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदेमातरम गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सरदेशमुख यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मागच्या तीन वर्षांपासून विद्यालयात श्रीमदभग्वदगीता पठणाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून केशवराज विद्यालय हे मराठवाड्यातील गुणवंतांची खाण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका राजश्री कुलकर्णी यांनी केले.
संगीत शिक्षक संतोष बीडकर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, केंद्रीय विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, रेनीसन्स सीबीएसई स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिरूरे, केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विभाग प्रमुख रेखा पुरी, केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, केशव शिशु वाटिका प्रधानाचार्या अवंती कुलकर्णी, संपत पाटील, सुधीर धुतेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.




















