जालना / बदनापूर – बदनापूर नगर पंचायतच्या निष्काळजी कारभारामुळे शहरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबून राहिल्या असून, साचलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर गदा येत आहे.
हुसेन नगर, पवार गल्ली, गैबिशावळी नगर, गणेश नगर अशा अनेक भागांमध्ये गटारीत साचलेला कचरा आणि थांबलेले पाणी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळा ओसरूनही स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
“स्वच्छ शहर” मोहिमेचा फोल नारा!
तीन वर्षांपूर्वी नगर पंचायतने “स्वच्छ शहर – सुंदर बदनापूर” असा नारा देत मोठ्या उत्साहात मोहीम राबवली होती. नागरिक, सामाजिक संस्था आणि संघटनांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र, या मोहिमेचा आता फक्त नारा उरला आहे. प्रत्यक्षात स्वच्छतेची कामे थांबली असून प्रशासनाकडून कोणतेही सातत्य दिसत नाही.
नागरिकांचा संताप — आंदोलनाची चेतावणी!
अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही नगर पंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
“शहरातील गटारींची तातडीने स्वच्छता करून कचरा उठाव सुरू न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिला आहे.
आरोग्य विभागास सावधानतेचा इशारा!
शहरात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. नागरिकांनीही घर परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ओळ : बदनापूर शहरातील हुसेननगर परिसरातील तुंबलेली गटार व साचलेला कचरा, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त.




















