सोलापूर – राज्यातील विक्रमी उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्य तसेच ज्वारी या भुसार शेतमालाची आवक वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर प्राप्त होत असल्याने, अनेक शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळाले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात देखील सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणला जात आहे. गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी श्रीसिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सुमारे ५२३ क्विंटल इतकी अवाक आली होती. लिलावात सोयाबीनला सर्वात कमी ३,५०० रुपये तर सर्वाधिक ४,५१५ रुपये आणि सरासरी ४,२०० रुपये असा प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीच्या गुळ गोडाऊनमध्ये हा लिलाव पार पाडला. यावेळी अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला खरेदीदार यांच्यासमोर ठेवल्यानंतर लिलावात बोली लावण्यात आली. सुरुवात २० रुपयांपासून करण्यात आली.
दरम्यान, सोयाबीन नंतर सर्वात जास्त पिकवले जाणारे कडधान्य म्हणून उडदाकडे पाहिले जाते. उडदाचा उतारा देखील मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने, शेतकरी उडीद पेरतो. बाजार समितीत उडदाची सुमारे १५० पिशव्या आवक आली होती. उडदाला सर्वात कमी २,८०० रुपये, सर्वाधिक ७,२०० रुपये तर सरासरी ५,२०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर जिल्ह्यात तुरीचे उत्पादन क्षेत्र देखील बऱ्यापैकी आहे. तूरची ८५ पिशव्या आवक बाजारात आली होती. तुरीला सर्वाधिक ७,००० रुपये तर सर्वात कमी ५,८०० रुपये आणि सरासरी ६,४०० रुपये असा प्रतिक्विंटल दर प्राप्त झाला. त्याचप्रमाणे लोकल हरभऱ्याला कमीत कमी ५,५०० रुपये तर सर्वाधिक ६,००० रुपये तर अण्णगिरी हरभऱ्याला ६,००० ते ६,१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कडधान्याच्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. केंद्र सुरू करण्यासाठी लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी असल्याचे दिसत आहे.
साठवणुकीची ज्वारी बाजारात
कडधान्याच्या आवक झाल्यानंतर बाजारपेठेत ज्वारीची देखील आवक वाढत आहे. सध्या बाजारात साठवणुकीची ज्वारी विक्रीसाठी दाखल होत आहे. गुरुवारी बाजार समितीत साठवणुकीतील मालदांडी ज्वारीची आवक सुमारे ४१ क्विंटल इतकी होती. लिलावात ज्वारीला बोली लावण्यात आली. आडते आणि खरेदीदार यांच्या बोलीतून ज्वारीला कमीत कमी २,३१० ते सर्वाधिक ३,७४८ रुपये तर सरासरी ३२०५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
प्रतीनुसार सोयाबीनचे दर
गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर चार हजारापर्यंत होते. सध्या बाजारात आवक आणि दर दोन्ही वाढत आहेत. चांगल्या दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने खरेदीदार देखील यामध्ये उत्सुकता दाखवत आहेत. लिलावात कडधान्याला चांगला दर मिळत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजले तरी, सोयाबीन वळवून शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.
सुनील माने, खरेदीदार
सोयाबीन प्रमाणेच ज्वारीला देखील भाव
सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तसेच ज्वारीच्या उत्पादनाला चांगले दर मिळत आहेत. साठवणुकीची ज्वारी बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. ज्वारीला देखील चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला सोयाबीन उडीद तूर खराब झाल्याने दर प्रतवारीनुसार ठरत आहेत.
बसवराज इटकळे, अडते
भाव वाढीची अपेक्षा
सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरू होणार आहे. केंद्रामध्ये सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा आहे. ज्वारीचे दर सध्या वाढत आहेत. अशीच दर वाढीच्या पेक्षा आहे.
– औदुंबर मस्के, शेतकरी






















