
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे सावध राहण्याचा इशारा दिला आहे. “महायुतीमध्ये कटुता निर्माण होईल किंवा मिठाचा खडा पडेल, असे कोणतेही कृत्य होऊ नये,” असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका मांडली.
गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टोला लगावला. “पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी जिल्ह्यातील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन जाणे हे त्यांचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. महायुतीमध्ये शिवसेनाही महत्त्वाचा घटक असून मतदान प्रक्रियेत आमचाही वाटा आहे, याची आठवण करून देत सामंत म्हणाले, “समन्वयाने काम केल्यास निवडणूक अधिक प्रभावीपणे पार पडू शकते. मात्र मित्रपक्षांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि कटुता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात जिल्हास्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडल्याची माहिती देत त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही ही भूमिका घालणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात सुमारे ११० सदस्य असल्याने निवडणुकीत सर्व पक्षांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार असल्याच्या चर्चेलाही सामंत यांनी पूर्णविराम दिला. “आमच्या कोणत्याही नेत्याने अशी भूमिका मांडलेली नाही. लोकशाहीमध्ये कोणीही कोणाला भेटू शकते,” असे ते म्हणाले.
लोकशाही प्रक्रियेत कोणीही अर्ज खरेदी करू शकतो, असे सांगत त्यांनी शिवसेनेची भूमिका महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. जागावाटपाबाबत बोलताना सामंत म्हणाले, “आमच्या विद्यमान जागा कायम ठेवून दोन अतिरिक्त जागांची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.”
























