पंढरपूर – येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी (ता.९) प्रक्षाळपुजेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी व कातिकी यात्रे नंतर परंपरे नुसार प्रक्षाळपुजेचा उत्सव विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. त्यानुसार लिंबु साखर लावून केशरयुक्त पाण्याच्या स्नाना नंतर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेस खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. या बरोबरच यात्रेच्या काळात भक्तांना चोविसतास दर्शन देवून थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिनवटा जावा म्हणून परंपरे नुसार विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे पंधरा ते सोळा पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढा देखील रात्रीच्या वेळी दाखविण्यात आला.
आषाढी व कातिकी यात्रांच्या वेळी येथे लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी विठुराय हे रात्रदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धुपआरती, रात्री शेजारती असे रोजोपचार बंद असतात. फक्त दैनंदिन काही नित्योपचार मात्र सुरु असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग देखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देवुन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो.
विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिनवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रे नंतर एक चांगला (शुभ) दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपुजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार रविवारी (ता.९) प्रक्षाळपुजे निमित्त मंदिराची स्वच्छता करण्यात आली. विठ्ठलाला लिंबु साखर लावून केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालून मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

त्या नंतर सायंकाळी देवाला आकर्षक पोशाख परिधान करुन पारंपारिक अशा विविध दुर्मिळ सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे धुपाआरतीचा कार्यक्रम झाला. या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला विठ्ठलाचा पलंग देखील शयनघरात पुर्ववत लावण्यात आला. यात्रेच्या कालावधीत दिवसरात्र भक्तांना दर्शन देवून थकलेल्या विठुरायाचा शिनवटा नाहिसा व्हावा यासाठी त्याला रात्रीच्या वेळी गवतीचहासह अन्य विविध पदार्थां पासून बनविलेल्या असा खास आयुर्वेदिक काढा देखील दाखविण्यात आला.
———————
आयुर्वेदिक काढ्यात विविध पदार्थांचा समावेश –
विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा यासाठी त्याला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवतीचहाची पाने, गुळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजु, बदामबी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थां पासून खास काढा बनविण्यात येत असतो. हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात चोविसतास दर्शन देवून विठ्ठलाला आलेला शिनवाटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो अशी या मागची भावना असल्याचे सांगितले जाते.
——————-
निगडे आणि नडगिरे यांच्या हस्ते पुजा संपन्न –
श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा रविवारी मुहूर्तानुसार अनुक्रमे मंदिर समिती सदस्या ॲड.माधवी निगडे व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
——————–
देवाचे नित्योपचार आणि राजोपचारास प्रारंभ –
दरम्यान प्रक्षाळपुजे पासून श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणीस पारंपारिक दागिने परिधान –
प्रक्षाळपुजे निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, मोत्याची कंठी १ पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तुळशीच माळ १ पदरी, शिरपेच लहान १० लोलक असलेला, शिरपेच मोठा २ लोलक असलेला, तोडे जोड, जवेची माळ २ पदरी, एकदाणी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत. या बरोबरच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्य जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
——————–
फोटोआळी : पंढरपूर : प्रक्षाळपुजे नंतर रविवारी विठ्ठल रुक्मिणी मातेला आकर्षक वस्त्रे परिधान करुन पारंपारिक अशा विविध प्रकारच्या सोन्याच्या दुर्मिळ अलंकारांनी सजविण्यात आले होते.

















