सोलापूर – सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले. यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची तसेच पक्षाची आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील आठवड्यात अजित पवार यांचा दौरा निश्चित होईल, असेही यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काही आजी माजी नगरसेवकांचे स्थान धोक्यात आले आहे. तर काही नगरसेवक सेफ झाले आहेत. गोळा बेरजेच्या राजकारणात अनेक नेते मंडळी पक्ष बदलण्याच्या स्थितीत आले आहेत. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आणि समर्थकांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार, बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या आरोळ्या उठत आहेत. माने यांच्या भाजप प्रवेशाला ‘ब्रेक’ लागल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह आनंद चंदनशिवे, किसन जाधव, जुबेर बागवान, तौफिक शेख आदी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप प्रवेश रखडल्यानंतर दिलीप माने सध्या पक्षी राजकारणापासून अलिप्त दिसत आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला उघड विरोध करंत थेट पक्षाच्या कार्यालयासमोरच आंदोलन केले. त्यानंतर पक्षाने निरीक्षक पाठवून अंदाज घेण्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याने माने यांचा प्रवेश थांबला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून माने हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता माने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
राजकीय भेट नव्हती.
माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली. मात्र, ती राजकीय नव्हती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही बँकेच्या कामासंदर्भात त्यांना भेटायला गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा विषय आला नाही.
संतोष पवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर

















