बार्शी – बार्शी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. अनेक दिवस गुप्तपणे सुरु असलेल्या बैठका, पडद्यामागील चर्चा आणि विविध गटांची रणनीती अखेर उघड झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बार्शीतील प्रभावशाली आणि निर्णायक मतदारसंघ असलेल्या वाणी कुटुंबाने आज विनोद नाना वाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये एकजुटीने प्रवेश करुन टाकला. या प्रवेशातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून राजकीय दुराव्यात राहिलेले माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विनोदनाना वाणी हे दोघे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर आले.
विनोदनाना वाणी हे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे तालुका प्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांचा प्रभाव, लोकसंपर्क आणि राजकीय ओळख प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मध्ये दशकभरापासून ठळकपणे जाणवत होती. त्यांच्या नेतृत्वाखाली वाणी कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य विशाल वाणी, बंडू वाणी, पांडुरंग वाणी, त्र्यंबक बापू वाणी, श्रीकांत वाणी आणि अनिलअण्णा वाणी भाजपात दाखल झाले. वाणी कुटुंबाची ताकद फक्त वरिष्ठ पातळीपुरती मर्यादित नसून, त्यांच्या कुटुंबातील भैया वाणी यांची युवकांमधील पकड, संघटनशक्ती आणि मोठ्या प्रमाणातील युवा संपर्क हेही एक महत्त्वाचे घटक आहेत. भैया वाणी यांच्यामुळे भाजपाला थेट युवा वर्गाचा पाठिंबा वाढेल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रभागांमध्ये तरुण मतदारांची संख्या मोठी असल्याने हा घटक भाजपा बळकटीचे आणखी एक कारण ठरु शकतो.
या प्रवेशामुळे भाजपात नवा जोश निर्माण झाला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजस्विनी प्रशांत कथले यांच्या प्रचारालाही याचा मोठा लाभ होईल, असे स्पष्ट दिसत आहे. वाणी कुटुंबाची तीन प्रभागांवरील पकड, त्यांचा समाजातील प्रभाव आणि युवा वर्गातील वाढती लोकप्रियता लक्षात घेता, तेजस्विनी कथले यांचे राजकीय समीकरण आता अधिक मजबूत झाले आहे. त्यांच्या प्रचाराची व्याप्ती वाढवण्यासाठी वाणी कुटुंबाचा पाठिंबा निर्णायक ठरणार असून या निर्णयाने नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवा टप्पा सुरु झाल्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून राजेंद्र राऊत यांच्या गुप्त बैठकींच्या चर्चेने संपूर्ण बार्शी हादरली होती. त्या बैठकींचे पहिले मोठे फलित आजच्या या पक्ष प्रवेशाच्या रुपाने समोर आले आहे. या घडामोडीनंतर बार्शीत अजून कोणाचा भाजपा प्रवेश होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. वाणी कुटुंबाच्या प्रवेशाने बार्शी नगरपरिषद निवडणुकीचा चेहरामोहरा बदलला असून भाजपा आता शहरात आपले बळकटीकरण अत्यंत वेगाने करत असल्याचे दृश्य स्पष्ट होत आहे.


















