बार्शी – बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी बार्शीमध्ये भाजपने शिंदे सेनेसोबत युती केली असून भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बार्शीत शिवसेना ६ तर भाजप ३६ जागा आणि नगराध्यक्ष पदाची जागा लढवणार असल्याची घोषणा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी बार्शीत केली.
बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल असे वाटत होते.
मात्र माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनपेक्षितपणे शिंदे सेनेला नगरसेवक पदाच्या सहा जागा दिल्या असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. नगरसेवकपदाच्या ३६ जागा आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपचा असणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माजी मंत्री आणि बार्शी तालुका निरीक्षक उत्तमप्रकाश खंदारे, भाऊसाहेब आंधळकर, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रमेश पाटील, ऍड वासुदेव ढगे, विलास रेणके, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, शिंदे सेनेचे तालुका प्रमुख विजय माने, प्रकाश माने, रिपाइंचे ऍड अविनाश गायकवाड, श्रीधर कांबळे, प्रकाश मनगिरे, आनंद यादव, सुभाष लोढा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, नगराध्यक्षपद आणि ३६ नगरसेवक जागा भाजप कमळाच्या चिन्हावर लढणार आहे तर ६ जागा शिंदे सेनेला देण्यात आल्या आहेत. अजितदादा गटाशीही संपर्क झाला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा निर्णय होऊ शकला नाही. सोबतच रिपाइं ही आमच्या सोबत आहे.
आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही मधल्या एक वर्षाच्या काळात थांबलेला विकास पुन्हा सुरु करु, अशी ग्वाही देत आम्ही महायुती म्हणून सामोरे जात आहोत. सर्व घटक पक्ष एकत्र घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही यश निश्चित खेचून आणू.
विजय ठोंगे पाटील म्हणाले, बार्शीत शिवसेनेने पहिला नगराध्यक्ष दिला आहे. भाजपसोबत युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आम्हाला ६ जागा देण्यात आलेल्या आहेत. सर्व शिवसैनिक विजयासाठी प्रयत्न करतील. भगवा कसा फडकावयाचा याचे आमचे नियोजन सुरु आहे. सीएम, डीसीएम यांचे राजाभाऊवर विशेष प्रेम आहे. बार्शीतील आमची युती जिल्ह्याला दिशा देईल. बार्शीच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत, असेही ठोंगे पाटील म्हणाले.
पाण्याच्या प्रश्नावर राजाभाऊ राऊत म्हणाले, २९६ कोटींची उजनी पाणीपुरवठा योजना काम प्रगतीपथावर आहे. दररोज ४ कोटी लिटर पाणी येणार आहे. पाणीटंचाई का होती यांची वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मी लक्ष दिले नाही तर वर्षात पाण्याची अडचण निर्माण झाली. कोणत्या कामासाठी वर्षभरात एकही पत्र त्यांनी दिले नाही.
आम्ही काय विकास केला हे गाडीवर फिरवून दाखवू.
आम्ही आमदारकीच्या मागील अडीच वर्षात काय केले आहे हे विरोधकांना बरोबर नव्हे तर माझ्या दुचाकी गाडीवर फिरवून दाखवू. यापूर्वी त्यांनीच कार्यसम्राट आमदार म्हणून माझा उल्लेख केला आहे, हे सर्वांना माहीत आहे.
उत्तमप्रकाश खंदारे म्हणाले, महायुतीमध्ये जागा कोण किती लढवत आहे हे महत्वाचे नाही तर आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत हे महत्वाचे आहे.


















