सोलापूर : महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज मनपाच्या कॅम्प प्रशालेतील इयत्ता सहावी आणि इयत्ता नववीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. न्यूटनचा नियम, जलचक्र यासह विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जाणून घेतली. त्यास विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, सुविधा व गुणवत्ता यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधत शिक्षण क्षेत्राबद्दल विविध विषयांची माहिती घेतली. यावेळी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी मल्हारी माने , पर्यवेक्षक भगवान मुंढे, कॅम्प आवारातील मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन , मोसिना मुजावर , रेहाना नदाफ , माहेजबीन मुल्ला , हारुन बंदूकवाले , नाजनीन कोरबू, योगेश रंगम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे हे इयत्ता सहावीच्या वर्गात गेले. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचायला लावले. विविध शब्दांचे अर्थ विचारले. जलचक्र म्हणजे काय ? याबाबत विचारणा केली. त्यास संबंधित विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर मराठी प्रशालेमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात आयुक्तांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रश्न विचारले. रॉकेट आणि न्यूटनचा नियम यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेतला. त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने आणि उपस्थित पालकांचीही त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भौतिक सुविधा या संदर्भात चर्चा केली. येथील सुविधासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी आयुक्तांनी वर्गनिहाय अभ्यासक्रम, उपस्थिती, अध्यापन तंत्र, तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल जाणून घेतले. अभ्यासात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे प्रोत्साहन दिले. शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आधुनिक पद्धती वापरण्याचे, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी सर्जनशील अध्यापनावर भर देण्याचे तसेच प्रत्येक मुलाकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचे निर्देश दिले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, सृजनशील अध्यापन, वैयक्तिक लक्ष महत्त्वाचे : डॉ. ओम्बासे
“प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता उजळविणे हे शिक्षकांचे सर्वात मोठे कार्य आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सृजनशील अध्यापन आणि वैयक्तिक लक्ष या तीन सूत्रांवर शाळांनी काम करावे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, परिश्रम आणि आत्मविश्वास अंगीकारावा. आपली शाळा, आपली मुले आणि आपले भविष्य सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
शाळेतील पायाभूत सुविधा, स्वच्छते संदर्भात केल्या सूचना
शाळेतील पायाभूत सुविधा, शिस्त, स्वच्छता, वर्गखोल्यांची स्थिती, उपलब्ध संसाधने यांचेही निरीक्षण केले. शाळेतील वातावरण अधिक प्रेरणादायी राहावे यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.




















