हदगाव / नांदेड – हदगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष पदाकरिता सहा नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि चार अपक्ष उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदासाठी ९६ उमेदवार शेवटी निवडणूक रिंगणात उरले आहेत. हदगाव शहरात एकूण २३१९४ मतदार असून २७ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी कळविली आहे. यात एक माजी नगराध्यक्ष व अनेक नगरसेवक सुद्धा नगरसेवक पदासाठी नशिब अजमावत आहेत.
हदगाव नगरपरिषद निवडणुकीचे उमेदवारांनी माघार घेण्याचे आज शेवटच्या दिवशी एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतली. यात नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या गीता गोपाल सारडा या अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर प्रभाग १ (अ) मधून विनायक पावडे प्रभाग २ (ब) मधून शहनाजबी आयुब खान, प्रभाग ७ (अ) मधून बालाजी शंकुरवार आणि सतीश पोगरे या दोघांनी तर प्रभाग ८ (ब) मधून वर्षाताई देशमुख आणि ९ (ब) मधून नागेश पवार यांनी नगरसेवक पदाच्या लढतीतून माघार घेतली.
वर्षाताई देशमुख यांनी आठ ब मधून नगरसेवक पदासाठी माघार घेतली असली तरी त्यांचा दुसरा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज कायम आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेनेकडून सीमा बालाजी घाळप्पा तर शिवसेनेकडून रोहिणी भास्कर वानखेडे आणि काँग्रेसकडून कुमुद सुनील सोनुले तसेच वंचित बहुजन आघाडी कडून चाऊस इराम आफशन जाकीर आणि रिपब्लिकन सेना या पक्षाकडून स्वरूपा अतुल चौरे हे निवडणूक लढवत आहेत याशिवाय इतर चार अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.


















