सोलापूर – संपूर्ण देशभरात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने अर्थात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरवून टाकला आहे.
केवळ 3 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून निर्दयीपणे दगडाने ठेचून तिची हत्या २४ वर्षाच्या एका नराधमाकडून करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान शनिवारी एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने किल्लाबाग परिसरातील हरळी प्लॉट योगासन मंडळातील बुद्धिजीवी वर्गातील जेष्ठ मान्यवरांसोबत त्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
डोंगराळे गावातील चिमुकलीवर अत्याचार करून तिची अतिशय निष्ठुरपणे हत्या करणाऱ्या आरोपी विजय खैरनार ह्या गुन्हेगाराला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टातून खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोलापूरकरांनी व्यक्त केली. यावेळी योगासन मंडळातील विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा दुष्ट प्रवृत्तीना धडा शिकवला जावा,जेणेकरून अशा पद्धतीच्या मानसिकतेला आळा बसावा तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने नीतीमूल्यांची जपणूक करत तसेच भारतीय कौटुंबिक व्यवस्थेची जपणूक करत आपला परिसर, कुटुंब आणि भावी पिढी अधिकाधिक सुसंस्कृत व सनातन समाज कसा घडवता येईल यावर विविध मान्यवरानी भाष्य केले.
प्रास्ताविक एकत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक करकी तर सुञसंचालन राजेश केकडे यांनी केले.
बालिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष मोहन तुम्मा,श्रीनाथ श्रीगण, ऋषिकेश हरसुरे, शहाबाज मकानदार, प्रवीण गावडे, राजेश वाघमोडे,महादेव तोग्गी, गणपतसा मिरजकर, विजयकुमार मेणसे, राजूसा भुमकर,संजय बिद्री, प्रकाश अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.



















